
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. त्यांच्या इस्रायल दौर्यादरम्यान पंतप्रधानांच्या विमानाची लोकेशन जगभरात सर्वाधिक वेळा शोधली गेली. जगभरातील विमानांच्या हालचाली ट्रॅक करणाऱ्या ‘फ्लाइटरडार’च्या आकडेवारीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे साडेतीन वाजता पंतप्रधान मोदी यांचे विमान सौदी अरेबियातून जॉर्डनच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत असताना तब्बल ७,१८४ लोक ते थेट ट्रॅक करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तान आणि इराणच्या हवाई क्षेत्राला टाळून अरबी समुद्राच्या मार्गाने इस्रायलमध्ये पोहोचले. हे विमान नवी दिल्लीतील पालम एअर फोर्स स्टेशनवरून उड्डाण करून गुजरातच्या मार्गे अरबी समुद्र पार करत ओमानमध्ये पोहोचले. तेथून पुढे सौदी अरेबिया मार्गे जॉर्डनच्या दिशेने जात इस्रायलच्या सीमेत प्रवेश केला. त्यानंतर विमान तेल अवीव येथील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.
पंतप्रधान मोदी ‘एअर इंडिया वन’ या विशेष विमानाने इस्रायलमध्ये पोहोचले. सुरक्षेच्या दृष्टीने हे भारत सरकारचे सर्वात महत्त्वाचे आणि अत्याधुनिक विमान मानले जाते. या विमानाचा वापर पंतप्रधान आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी करतात. या विमानांमध्ये कमांड सेंटर, सुरक्षित संप्रेषण व्यवस्था आणि अत्याधुनिक संरक्षण प्रणालींचा समावेश असतो. सामान्यतः भारतातून इस्रायलपर्यंतचा प्रवास सुमारे ६ ते ७ तासांचा असतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode