
नवी दिल्ली , 25 फेब्रुवारी (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसीय दौर्यावर इस्रायलमध्ये दाखल झाले.तेल अवीव विमानतळावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा नेतन्याहू यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. प्रोटोकॉल मोडत नेतन्याहू यांनी ‘माझे मित्र मोदी’ असे म्हणत त्यांना मिठी मारली. यावेळी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ तेथे भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेला, म्हणजेच नेसेटला, देखील संबोधित करणार आहेत. असे करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.
इस्रायली पंतप्रधानांकडून झालेल्या या स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, “विमानतळावर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलेल्या स्वागतामुळे मी सन्मानित झालो आहे. द्विपक्षीय चर्चांमधून आणि भारत-इस्रायल मैत्री अधिक बळकट करण्यासाठी सकारात्मक परिणाम मिळतील, अशी मला अपेक्षा आहे.”
पुढील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “इस्रायलमध्ये पोहोचलो… पंतप्रधान नेतन्याहू आणि श्रीमती नेतन्याहू यांनी विमानतळावर स्वागत केल्याने मी अत्यंत सन्मानित झालो आहे. द्विपक्षीय चर्चांमधून आणि भारत-इस्रायल मैत्री अधिक दृढ करणारे अर्थपूर्ण परिणाम साध्य होतील, अशी आशा आहे.”दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, “माझे प्रिय मित्र पंतप्रधान मोदी, इस्रायलमध्ये आपले स्वागत आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी इस्रायलसाठी रवाना झाले आणि सायंकाळी सुमारे ४.३० वाजता तेल अवीव येथे पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ वर्षांनंतरचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे. यापूर्वी ते जुलै २०१७ मध्ये इस्रायलला गेले होते. २६ फेब्रुवारी रोजी प्रतिनिधीमंडळाची बैठक होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हर्ज़ोग यांचीही भेट घेणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाच्या काळात होत आहे. मध्यपूर्वेत तणाव वाढलेला असताना आणि गाझामध्ये युद्ध थांबूनही अधूनमधून चकमकी सुरू असताना हा दौरा पार पडत आहे.
याआधी इस्रायलला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, “माझे मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून मी इस्रायलच्या राजकीय दौर्यावर जात आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात मजबूत आणि बहुआयामी सामरिक भागीदारी आहे, ज्यामध्ये अलीकडच्या वर्षांत मोठी वाढ आणि गती दिसून आली आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode