दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करण्याची प्रवीण खंडेलवाल यांची केंद्राला विनंती
नवी दिल्ली , 25 फेब्रुवारी (हिं.स.)।केरळचे नाव बदलून केरळम करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. दिल्लीतील चांदणी चौकचे भाजप खासदार तसेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच
दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करण्याची प्रवीन खंडेलवाल यांची अमित शाहांना पत्राद्वारे मागणी


नवी दिल्ली , 25 फेब्रुवारी (हिं.स.)।केरळचे नाव बदलून केरळम करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. दिल्लीतील चांदणी चौकचे भाजप खासदार तसेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्र सरकारला राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, असा निर्णय घेतल्यास राजधानीची ऐतिहासिक आणि सभ्यतागत ओळख पुन्हा अधोरेखित होईल.

खंडेलवाल यांनी सुचवले की, दिल्लीतील एखाद्या योग्य ठिकाणी कदाचित पुराना क़िला येथे पांडवांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात यावी, ज्यामुळे दिल्लीची प्राचीन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा अधिक ठळकपणे समोर येईल. त्यांनी स्वतंत्र पत्राद्वारे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनाही दिल्ली विधानसभेत ‘इंद्रप्रस्थ’ नावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रात खंडेलवाल यांनी नमूद केले की, भारत हा जगातील सर्वात प्राचीन जिवंत संस्कृतींपैकी एक देश आहे आणि त्याच्या राष्ट्रीय राजधानीचे नावही त्याच्या सखोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब असावे.

त्यांनी सांगितले की, ऐतिहासिक साहित्य, पुरातत्त्वीय पुरावे आणि दीर्घकालीन सभ्यतागत परंपरा यांवरून सध्याची दिल्ली हीच प्राचीन इंद्रप्रस्थ असल्याचे स्पष्ट होते. महाकाव्य महाभारत मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, पांडवांनी वसवलेले इंद्रप्रस्थ हे यमुना नदीच्या तीरावर वसलेले वैभवशाली आणि समृद्ध नगर होते, ज्याचे भौगोलिक स्वरूप आजच्या दिल्लीशी जुळते.

खंडेलवाल यांनी पुढे सांगितले की, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पुराना किल्ला येथे केलेल्या उत्खननात सुमारे इ.स.पू. 1000 वर्षांपूर्वीच्या वसाहतींचे पुरावे आढळले आहेत. यात पेंटेड ग्रे वेअर (PGW) संस्कृतीचे अवशेषही सापडले असून, त्यांचा संबंध महाभारतकालीन काळाशी जोडला जातो. त्यांच्या मते, या निष्कर्षांमुळे प्राचीन इंद्रप्रस्थ याच ठिकाणी होते, ही ऐतिहासिक धारणा अधिक बळकट होते.खंडेलवाल म्हणाले की ‘दिल्ली’ हे नाव तुलनेने नंतरच्या मध्ययुगीन काळात प्रचलित झाले. इतिहासकार त्याचा संबंध ढिल्लिका किंवा देहली अशा नावांशी जोडतात; मात्र ते या प्रदेशाच्या मूळ आणि प्राचीन सभ्यतागत ओळखीचे प्रतिनिधित्व करत नाही.

“इंद्रप्रस्थ हे राजधानीच्या मूलभूत सभ्यतागत ओळखीचे प्रतीक आहे, तर ‘दिल्ली’ हे इतिहासातील नंतरच्या टप्प्याचे द्योतक आहे. राजधानीचे नाव इंद्रप्रस्थ केल्यास भारताच्या प्राचीन वारशाशी असलेले नाते अधिक दृढ होईल आणि सांस्कृतिक सातत्याला बळकटी मिळेल,” असे खंडेलवाल यांनी म्हटले. त्यांनी नमूद केले की, भारतातील अनेक शहरांची ऐतिहासिक नावे पुन्हा प्रस्थापित करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि प्रयागराज ही प्रमुख उदाहरणे आहेत.खंडेलवाल यांनी असेही सांगितले की ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव आधीपासूनच दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि स्थळांमध्ये वापरले जाते, ज्यामुळे या ऐतिहासिक नावाला समाजात स्वाभाविक स्वीकार मिळाल्याचे दिसून येते.

दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करण्याचा निर्णय हा राजधानीच्या सभ्यतागत ओळखीच्या पुनर्स्थापनेसाठी ऐतिहासिक पाऊल ठरेल, असे त्यांनी म्हटले. यामुळे राष्ट्रीय अभिमान अधिक दृढ होईल आणि जगासमोर भारताचा प्राचीन वारसा प्रभावीपणे सादर करता येईल.शेवटी, त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ आणि इतर तज्ज्ञांशी सल्लामसलत करून या प्रस्तावावरील औपचारिक प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले. “हा निर्णय केवळ ऐतिहासिक विसंगती दूर करणार नाही, तर भारताच्या महान सभ्यतेच्या वारशाचा सन्मान आणि जतन करण्याच्या आपल्या बांधिलकीलाही बळकटी देईल,” असे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande