
होबार्ट, 26 फेब्रुवारी (हिं.स.)भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाच्या ऑस्ट्रेलियाला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-1 असे पराभूत करून FIH प्रो लीगमधील दीर्घ पराभवाची मालिका संपवली. दोन्ही संघांचे नियमित वेळेच्या शेवटी 1-1 असे बरोबरी होते.
या विजयामुळे प्रो लीगच्या पुढील टप्प्यापूर्वी भारताचे मनोबल वाढेल. पहिले तीन क्वार्टर अत्यंत स्पर्धात्मक होते. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर प्रत्येक प्रकारे कठीण आव्हान उभे केले. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही.
ऑस्ट्रेलियाने अखेर 49 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून जेरेमी हेवर्डच्या गोलने आघाडी घेतली. पण ऑस्ट्रेलियाचा आनंद अल्पकाळ टिकला, कारण शिलानंद लाक्रा (51 व्या मिनिटाला) ने दोन मिनिटांनी शानदार फील्ड गोल करून बरोबरी साधली.
त्यानंतर दोन्ही संघांनी निर्णायक गोल करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला, त्यामुळे सामना शूटआउटमध्ये गेला, जिथे भारताने विजय मिळवला आणि दोन गुण मिळवले, तर ऑस्ट्रेलियाला एक गुण मिळाला.
भारताकडून लाक्रा, मनिंदर सिंग आणि विष्णुकांत सिंग यांनी शूटआउटमध्ये गोल केले, तर हेवर्डने ऑस्ट्रेलियाचा एकमेव गोल केला. उर्वरित ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे शॉट्स रोखून भारतीय गोलकीपर मोहित शशिकुमार होनेनहल्लीने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रो लीगचा राउरकेला लेग भारतासाठी निराशाजनक होता, त्यांनी आपले चारही सामने गमावले. त्यानंतर भारताने होबार्ट लेगची सुरुवात पराभवाने केली. पहिल्या सामन्यात भारताचा स्पेनकडून 0-2 असा पराभव झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-2 अशा बरोबरीनंतर त्यांना 4-5 अशा शूटआउटमध्ये पराभव पत्करावा लागला. मंगळवारी स्पेनविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 1-1 अशा बरोबरीनंतर, भारतीय संघाला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-4 असा पराभव पत्करावा लागला. भारत सध्या नऊ संघांच्या स्पर्धेत आठव्या स्थानावर आहे, त्याने आठ सामन्यांतून फक्त चार गुण मिळवले आहेत. भारत रॉटरडॅम लेगमध्ये नेदरलँड्स आणि जर्मनीविरुद्ध खेळेल, ज्याची सुरुवात 21 जून रोजी यजमानांविरुद्धच्या सामन्याने होणार आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे