टी-20 विश्वचषकातील यजमान श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात
कोलंबो, 26 फेब्रुवारी (हिं.स.)मिचेल सँटनर आणि कोल मॅककोंची यांच्यातील अर्धशतकी भागीदारी आणि रचिन रवींद्रच्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने टी-२० विश्वचषकात सह-यजमान श्रीलंकेचा ६१ धावांनी पराभव केला. यामुळे श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आह
दासुन शनाका


कोलंबो, 26 फेब्रुवारी (हिं.स.)मिचेल सँटनर आणि कोल मॅककोंची यांच्यातील अर्धशतकी भागीदारी आणि रचिन रवींद्रच्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने टी-२० विश्वचषकात सह-यजमान श्रीलंकेचा ६१ धावांनी पराभव केला. यामुळे श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. संघ आता पाकिस्तानविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळेल. कोलंबो येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेला निर्धारित षटकांत ८ बाद फक्त १०७ धावा करता आल्या आणि त्यांना सामना गमावावा लागला.

सुपर ८ सामन्यातील विजयासह, न्यूझीलंड गट २ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्यांचे ३ गुण आणि निव्वळ धावगती +३.०५० आहे. दरम्यान, इंग्लंड चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड आता शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध त्यांचा शेवटचा सुपर ८ सामना खेळेल. सलग दोन सामने गमावल्यानंतर श्रीलंका गुणतालिकेत तळाशी घसरला आहे. दरम्यान, पाकिस्तान सध्या एका गुणासह आणि -०.४६१ च्या नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. सलमान आघाचा संघ २८ फेब्रुवारी रोजी आपला शेवटचा सामना खेळत आहे. जरी पाकिस्तानने हा सामना जिंकला तरी त्यांना जास्तीत जास्त तीन गुण मिळतील, पण न्यूझीलंड नेट रन रेटवर त्यांना मागे टाकेल आणि उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, न्यूझीलंडने ७ बाद १६८ धावा केल्या. टिम सेफर्ट आणि फिन ऍलन यांनी संघाला जलद सुरुवात दिली, ३.१ षटकात ३० धावा जोडल्या. ऍलन २३ आणि सेफर्ट ८ धावांवर बाद झाले.त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र यांनी डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या, ज्यामध्ये रचिनने २२ चेंडूत ३२ धावा केल्या. पण त्यांनी ८४ धावा केल्या तोपर्यंत न्यूझीलंडने सहा विकेट गमावल्या होत्या आणि ते अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत कर्णधार मिचेल सँटनर (४७ धावा) आणि कोल मॅककोन्ची (नाबाद ३१) यांनी शानदार भागीदारी रचली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८४ धावा जोडून संघाला १६८ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. श्रीलंकेकडून महेश थिकेशना आणि दुष्मंथा चामीरा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर दुनिथ वेलागेने एक विकेट घेतली.

१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पथुम निसांका पहिल्याच चेंडूवर धाव न घेता बाद झाला. त्यानंतर चरिथ असलंकाही लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. कुसल मेंडिसने ३१ धावांची खेळी करत काहीशी झुंज दाखवली. पवन रत्नायकेने १० आणि दुनिथ वेलागे यांनी २९ धावा केल्या, परंतु संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. संपूर्ण संघ निर्धारित षटकांमध्ये ८ विकेट गमावून फक्त १०७ धावाच करू शकला. न्यूझीलंडकडून, रचिन रवींद्रने शानदार गोलंदाजी केली, त्याने २७ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि तो सामनावीर ठरला. मॅट हेन्रीने २ तर कर्णधार सँटनरने १ एका फंलदाजाला बाद केले. या विजयासह, न्यूझीलंडच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande