काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी नडली! अमरावतीच्या राजकारणात भूकंप, बडा मोहरा भाजपाच्या गळाला
अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. ज्येष्ठ नेते बाळासाहेब हिंगणीकर यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेल्या
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी नडली! अमरावतीच्या राजकारणात भूकंप,  बडा मोहरा भाजपाच्या गळाला


अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.)

जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. ज्येष्ठ नेते बाळासाहेब हिंगणीकर यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसमधील स्थानिक गटबाजी आणि दुर्लक्षामुळे नाराज असलेल्या हिंगणीकर यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन भाजपची वाट धरली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेससाठी हा एक मोठा राजकीय तोटा मानला जात आहे.

बाळासाहेब उर्फ शंकर विश्वनाथ गावंडे (हिंगणीकर) यांची राजकीय कारकीर्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी सुरू झाली होती. शिवसेनेत असताना त्यांनी जिल्हाप्रमुख या अत्यंत महत्त्वाच्या पद सांभाळली.

त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पिंपळोद सर्कलचे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले. जिल्हा परिषदेचे वित्त आणि आरोग्य सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुळचे शिवसैनिक असलेले बाळासाहेब आता भाजपच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या जुन्या विचारधारेकडे परतणार आहेत.दर्यापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून हिंगणीकर यांना विश्वासात घेतले गेले नाही. सततच्या दुर्लक्षामुळे त्यांची पक्षात मोठी घुसमट होत होती. स्थानिक पातळीवरील वाढती गटबाजी आणि नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे हिंगणीकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले. आपली राजकीय कोंडी फोडण्यासाठी त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला होता. यामध्ये खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर त्यांनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला.

बाळासाहेब हिंगणीकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आता ठरला आहे. येत्या 7 मार्च रोजी एका विशेष सोहळ्यात ते भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील. राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

विशेष म्हणजे केवळ हिंगणीकरच नव्हे, तर त्यांच्यासोबत त्यांचे 40 पेक्षा अधिक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या मोठ्या बदलामुळे दर्यापूरमधील भाजपची ताकद वाढणार असून आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande