पालकमंत्र्यांचे आदेश धाब्यावर? बोअरवेल-हातपंप गैरव्यवहार चौकशीत विलंब; जिल्हा परिषद प्रशासनावर संगनमताचे आरोप
अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.) पंधराव्या वित्त आयोगांतर्गत अमरावती जिल्ह्यात करण्यात आलेल्या बोअरवेल व हातपंप उभारणीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतरही चौकशीला विलंब होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनावर प्रश
पालकमंत्र्यांचे आदेश धाब्यावर? बोअरवेल-हातपंप गैरव्यवहार चौकशीत विलंब;


अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.)

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत अमरावती जिल्ह्यात करण्यात आलेल्या बोअरवेल व हातपंप उभारणीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतरही चौकशीला विलंब होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. तसेच विभागीय आयुक्त, अमरावती व अप्पर जिल्हाधिकारी यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांना चौकशीसंदर्भात सूचना दिल्याचे सांगितले जाते.मात्र, या सर्व आदेशांनंतरही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?ग्रामपंचायत येवदा येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बोअरवेल व हातपंप उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च दाखविण्यात आला. तांत्रिक मान्यतेनुसार 200 फूट ड्रिलिंग अपेक्षित असताना प्रत्यक्षात कमी खोलीपर्यंत कामे झाल्याचा आरोप आहे. मात्र पूर्ण क्षमतेचे बिल अदा करण्यात आल्याने लाखो रुपयांचा अपव्यय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोअर वेल व हातपंपाच्या चौकशीबाबत येवदा येथील नागरिकांनी सुद्धा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना लेखी तक्रार सादर केली आहे. तसेच यापूर्वीही ग्रामपंचायत येवदा येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत नीलकमल खुर्ची खरेदी प्रकरण व एलईडी स्ट्रीट लाईट खरेदीतील अनियमिततेच्या तक्रारी ताज्या असतानाच आता पाणीपुरवठा कामांवरही संशयाची छाया पडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande