
लातूर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिका आता ऍक्शन मोडवर आली असून शहरात प्लास्टिक कॅरीबॅग जप्ती तसेच विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. कचरा टाकणारे व कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून संबंधितांकडून दंडाची वसुली केली जात आहे.महापौर श्रीमती जयश्री सोनकांबळे व मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या निर्देशानुसार उपायुक्त वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.
झोन बी, औसा रोड परिसरात अतिक्रमण करणारे व सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून २ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आली व ₹१२,००० दंड ठोठावण्यात आला. शहरातील इतर ठिकाणी कारवाई करून एकूण १२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उघड्यावर कचरा टाकणारे ३७ व कचरा जाळणारे ५ नागरिकांवर कारवाई करत ₹१८,००० दंड आकारण्यात आला.या मोहिमेत मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, निरीक्षक अक्रम शेख, शिवराज शिंदे, डी. एस. सोनवणे, रवी कांबळे व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.महापौर जयश्री सोनकांबळे यांनी नागरिकांना आवाहन केले की,सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा कचरा ओला-सुका वेगळा करून घंटागाडीतच द्यावाउघड्यावर कचरा टाकू किंवा जाळू नये
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis