
रायगड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। नवी मुंबईत प्रथमच पुरुषांच्या प्रजनन व लैंगिक आरोग्यासाठी स्वतंत्र ‘अँड्रॉलॉजी’ विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे. Medicover Hospitals यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या विभागात एकाच छताखाली तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, आधुनिक तपासण्या आणि अत्याधुनिक सूक्ष्म शस्त्रक्रिया (मायक्रोसर्जरी) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या विभागाचे नेतृत्व मूत्ररोगतज्ज्ञ व अँड्रॉलॉजिस्ट डॉ. सनीश श्रृंगारपुरे आणि मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. विकास भिसे करणार आहेत. अँड्रॉलॉजी ही मूत्ररोगशास्त्राची विशेष शाखा असून ती पुरुषांचे प्रजनन आरोग्य, वंध्यत्व, लैंगिक कार्यातील अडथळे, संप्रेरकांचे असंतुलन आणि संबंधित विकारांवर लक्ष केंद्रित करते.
रुग्णालयाच्या माहितीनुसार, पुरुष वंध्यत्व, ताठरतेचा अभाव (इरेक्टाइल डिसफंक्शन), अकाली वीर्यपतन, व्हॅरिकोसेल, टेस्टोस्टेरॉनची कमतरता (हायपोगोनॅडिझम), पेरोनी रोग, शुक्राणूंचा अभाव (अझूस्पर्मिया) तसेच लिंग व अंडकोषातील विकृतींसाठी व्यापक तपासणी व उपचार सुविधा येथे उपलब्ध राहतील.
या युनिटमध्ये सूक्ष्म शस्त्रक्रियेद्वारे व्हॅरिकोसेल उपचार, ताठरतेच्या समस्येसाठी कृत्रिम उपकरण प्रत्यारोपण, आयव्हीएफ/आयसीएसआयसाठी अंडकोषातून शुक्राणू काढण्याची विशेष तंत्रे, संप्रेरक उपचार, लिंगातील वक्रता दुरुस्ती शस्त्रक्रिया, पीआरपी व शॉकवेव्ह उपचार तसेच लिंग बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
डॉ. सनीश श्रृंगारपुरे यांनी सांगितले की, लाज किंवा जागरूकतेच्या अभावामुळे अनेक पुरुष उपचार घेण्यास उशीर करतात. योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञ उपचार मिळाल्यास बहुतेक समस्या प्रभावीपणे नियंत्रित करता येतात.
केंद्र प्रमुख संदीप जोशी यांनी नमूद केले की, पुरुषांनी आपल्या प्रजनन व लैंगिक आरोग्याविषयी संकोच न बाळगता तज्ज्ञांशी खुलेपणाने संवाद साधावा, या उद्देशानेच या विशेष विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके