
लातूर, 13 मार्च, (हिं.स.)। पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलंगेकर यांच्या पुढाकाराने निलंगा शहरातील ४५ हजार नागरिकांना आता 'आयुष्यमान कार्ड' मिळणार आहे. या कार्डमुळे नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा उपलब्ध होणार असून, अनेक गरजू रुग्णांना या माध्यमातून खऱ्या अर्थाने जीवनदान मिळणार आहे.
निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयराज हलगरकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप कुमार जाधव यांच्या नियोजनातून शहरातील ८ हजार कुटुंबांतील ४५ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. या भव्य नोंदणी मोहिमेसाठी निलंगा नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सरसावले असून, शहर व ग्रामीण भागातील १०५ आशा कार्यकर्त्यांमार्फत नागरिकांचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
११ प्रभागांत मोहीम; नगरसेवकांचा पुढाकार
निलंगा शहरातील ११ प्रभागांमधील २३ नगरसेवक आपापल्या प्रभागातील नागरिकांची नोंदणी करून घेण्यासाठी सक्रीय झाले आहेत. शहरात ही नोंदणी मोहीम सलग एक आठवडा चालणार आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुला-मुलींचा समावेश असून, या सर्वांना ५ लाखांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा मिळणार आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरपालिकेने उचललेल्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या मोहिमेच्या नियोजनावेळी नगरसेवक ईश्वर पाटील, स्वच्छता व दिवाबत्ती सभापती सुधा वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षी देशपांडे, नगरसेवक रमेश कांबळे, सचिन गायकवाड यांच्यासह नगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis