

रायगड, 13 मार्च (हिं.स.)। पेण तालुक्यातील दादर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो एकर जमीन भूसंपादन करण्यात आली, मात्र आजपर्यंत त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे बेकायदेशीररीत्या कंपनीच्या नावे करण्यात आलेले सातबारे पुन्हा शेतकऱ्यांच्या नावे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
“आमचा सातबारा कोरा झालाच पाहिजे”, “जमीन आमच्या हक्काची” अशा घोषणाबाजी करत सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य तसेच भाजपचे नेते वैकुंठ पाटील यांच्यासह दादर गावातील शेतकरी, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पेण तालुक्यातील दादर गाव पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. मात्र १९८९ साली आलेल्या महापुरात बांधबंदिस्ती तुटल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी बांधबंदिस्तीसाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला, परंतु कोणतीही ठोस योजना राबविण्यात आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
दरम्यान, ग्रामीण भागात उद्योगधंदे उभारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सेझ प्रकल्पांना परवानगी दिली. त्याअंतर्गत मुंबई एसईझेड प्रकल्पासाठी पेण तालुक्यातील अनेक गावांमधून जमीन संपादित करण्यात आली. दादर गावातील सुमारे ८०० एकर जमीन शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने दिली. मात्र अनेक वर्षे उलटूनही त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बेकायदेशीररीत्या सातबाऱ्यावर चढविलेले कंपनीचे नाव कमी करून जमीन पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी केली आहे.
-----------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)