
अकोला, 13 मार्च, (हिं.स.)। अकोला शहरातील गुंठेवारी व गांवठाण क्षेत्रातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणेकरिता येणा-या अडी-अडचणी दूर करणे संदर्भात महापौर सौ.शारदा रणजीत खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल गोगे आणि सभागृह नेता पवन महल्ले यांची मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या समवेत त्यांच्या दालनात विशेष बैठक संपन्न झाली आहे.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या गृह निर्माण विभागतील शासन परिपत्रक दि. 10 मार्च 2026 अन्वये राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत गावठाण क्षेत्रातील व गांवठाण क्षेत्राबाहेरील नागरिकांना योजनेच्या लाभाकरिता पात्र ठरविण्याबाबत सकारात्मक चर्चा संपन्न झाली.
यामध्ये गावठाण क्षेत्रातील तसेच गांवठाण क्षेत्राबाहेरील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही, अशा लाभार्थ्यांना मागील ३ वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधकाम (BLC) घटकांतर्गत पात्र ठरवण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी करताना, योजनेच्या निकषानुसार नगररचना विभागामार्फत घरकुल बांधकाम नकाशा मंजूर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी लाभार्थ्यांकडे जमिनीच्या मालकी हक्काचे दस्तावेज असणे आवश्यक आहे. मात्र, गावठाण क्षेत्रातील अनेक लाभार्थ्यांकडे मालमत्ता कर पावती व्यतिरिक्त इतर कोणतेही मालकी हक्काचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. तसेच अकोला महानगरपालिका क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक स्वतःच्या नांवावर जमीन नसतांनाही अनेक वर्षांपासून गावठाण जमिनीवर वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर जमीन असणे अनिवार्य असल्यामुळे, अशा पात्र व गरजू लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागले असते.
परंतू सदर परिपत्रकानुसार मा.आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे यानंतर गावठाण क्षेत्रातील तसेच गांवठाण क्षेत्राबाहेरील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही, अशा लाभार्थ्यांना मागील ३ वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधकाम (BLC) घटकांतर्गत पात्र ठरवण्यात आले आहे.”
तसेच गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांकरिता त्यांचे गुंठेवारी भूखंड नियमानूकुल करणे बाबात प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी यावेळी संबंधीतांना दिले. अकोला महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर तसेच शासन मालकीच्या जागेवर अतिक्रमण धारकांनासुध्दा त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेचे मालकी हक्क देऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणेकरिता आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने सुरू करणेबाबत निर्देश देण्यात आले.
या बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार, बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, सहा.नगररचनाकार संदीप गावंडे, प्रधानमंत्री आवास योजनेचे श्रीकांत माणिकराव, शुन्य कंसलटंसीचे मनीष भुतडा आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे