जन्मतारीख प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करा - जावेद जकरिया
अकोला, 13 मार्च (हिं.स.)। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव जावेद जकरिया यांनी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना जन्मतारीख प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणींबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन ही प्रक्रिया सुल
जन्मतारीख प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करा - जावेद जकरिया


अकोला, 13 मार्च (हिं.स.)। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव जावेद जकरिया यांनी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना जन्मतारीख प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणींबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन ही प्रक्रिया सुलभ करण्याची तसेच यासंदर्भात विशेष कायदा किंवा स्पष्ट शासकीय धोरण लागू करण्याची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत व तहसील कार्यालयांमध्ये जन्मतारीख प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एकसमान व स्पष्ट नियम नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

विशेषतः गरीब, ग्रामीण व मजूर वर्गातील नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागत असून अनेक वेळा विविध प्रकारची कागदपत्रे मागितली जातात. या अव्यवस्थित व्यवस्थेचा फायदा घेऊन काही दलाल व असामाजिक घटक नागरिकांकडून अनावश्यक पैसे वसूल करत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच अनेक जुन्या शासकीय नोंदी आजपर्यंत संगणक पद्धतीत नोंदविलेल्या नाहीत, काही ठिकाणी जुन्या नोंदी नष्ट झालेल्या आहेत किंवा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत त्या त्रुटींचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय अनेक नागरिकांच्या नावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये अक्षरांची चूक किंवा इतर त्रुटी आढळतात. त्यामुळे पुढील शासकीय तसेच शैक्षणिक कामांमध्ये त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. अशा प्रकरणांमध्ये नाव व जन्मतारीख दुरुस्तीची सोपी आणि स्पष्ट पद्धत असणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे.

जावेद जकरिया यांनी राज्य शासनाला सुचविले की जर एखाद्या नागरिकाकडे जन्माची मूळ नोंद किंवा कागदपत्र उपलब्ध नसतील तर त्याला न्यायालयामार्फत शपथपत्र देण्याची परवानगी देण्यात यावी. संबंधित व्यक्तीकडून विधिपूर्वक शपथपत्र घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची जन्मतारीख नोंदवून जन्म प्रमाणपत्र देण्याची सोपी व पारदर्शक व्यवस्था करण्यात यावी.

या महत्त्वाच्या विषयावर राज्य शासनाने गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना दिलासा देणारा सोपा, न्याय्य व प्रभावी कायदा किंवा धोरण लागू करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande