

अकोला, 13 मार्च (हिं.स.)। एकापेक्षा एक सरस हस्यकवी, गझलकार व विडंबनकारांच्या दर्जेदार सादरीकरण व विदारक वास्तवाचे जिवंत चित्र उभे करण्याच्या कौशल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापनदिन सोहळा दिमाखात पार पडला.
स्थानिक रत्नम लॉन्स येथे मनसे नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ह्या दिमाखदार सोहळ्यात सुप्रसिद्ध मराठी गझलकार एजाज शेख, वऱ्हाडी कवी प्रशांत भोंडे, हास्यकवी धीरज चावरे, हास्यसम्राट किशोर बळी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी रसिक श्रोत्यांना हास्याची मेजवानी दिली तर काहींनी आपल्या विडंबनात्मक शैलीत विदारक वास्तविकतेचे जिवंत चित्र उभे करून उपस्थित सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले. सुप्रसिद्ध कवी, गझलकार, निवेदक गोपाल मापारी यांच्या लयबद्ध सुत्रसंचालनाने सोहळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
याप्रसंगी प्रख्यात वास्तुविशारद चंद्रशेखर उमेकर व सर्पमित्र बाळ काळणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सोहळ्यास मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, पंकज साबळे, सतिश फाले आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मनसे शहर अध्यक्ष सौरभ भगत, जिल्हा सचिव ललित यावलकर आदींनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे