
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। परभणी जिल्हा क्रीडा कार्यालय, परभणी यांच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार असून पात्र युवक, युवती तसेच युवक विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे यांनी केले आहे.
राष्ट्र व राज्य निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून राज्यात मोठ्या संख्येने युवक तसेच संस्था सामाजिक कार्य करत आहेत. युवकांमधील सकारात्मक गुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणांतर्गत युवकांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी शासन निर्णया नुसार राज्य व जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
राज्य व जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवक विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांची मागील तीन वर्षांतील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. जिल्हा युवा पुरस्कार सन 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24 व 2024-25 या सहा वर्षांसाठी प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे : संस्था - रुपये 50 हजार, युवक - रुपये 10 हजार, युवती - रुपये 10 हजार तसेच गौरवपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी येथे सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी सूर्य नाटकर, क्रीडा अधिकारी (9637994855) व रोहन औंढेकर, क्रीडा अधिकारी (9913379299) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis