
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। जातिवार जनगणना, ओबीसी हक्कांचे संरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी भारत मुक्त मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र जातिवार कॉलम समाविष्ट करावा, एससी-एसटी व ओबीसींसाठी कडक यूजीसी इक्विटी नियम लागू करावेत तसेच 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पासून सूट द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
भारत मुक्त मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने देशभरात टप्प्याटप्प्याने आंदोलन राबविण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार 13 मार्च रोजी जिल्हा मुख्यालयांवर निदर्शने करण्यात आली. तसेच 23 मार्च रोजी जिल्हा मुख्यालयांवर रॅली काढण्यात येणार असून 23 एप्रिल रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बबनराव भंडारे, बालासाहेब जगधे, अॅड. विनोद आवरे, सुभाष भाळवे साडेगांवकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis