परभणी शहरात 16 व 17 मार्चला ग्रंथोत्सव
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या परिसरात दि. 16 व 17 मार्च 2026 रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने हा ग्रंथोत्सव आयोजित करण्या
परभणी शहरात 16 व 17 मार्चला ग्रंथोत्सव


परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या परिसरात दि. 16 व 17 मार्च 2026 रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील वाचनप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि साहित्य रसिकांसाठी हा उत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

ग्रंथोत्सवात विविध परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन तसेच साहित्यिक संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये साहित्यप्रेमींना नामवंत साहित्यिकांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांच्या विचारांचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या ग्रंथोत्सवात साहित्यिक, लेखक आणि वाचक यांचा सुंदर मेळावा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दि. 16 मार्च रोजी सकाळी 11.00 वा ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे राहणार आहेत.

दुपारी 2.30 वा. परिसंवाद कार्यक्रमात कृत्रिम बुध्दीमत्ता व साहित्य-एआय चा लेखन, भाषांतर व संस्कृतीवर परिणाम या विषयावर डॉ. धर्मराज वीर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 3.30 वा. राम निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कथाकथन कार्यक्रमात राजेंद्र गहाळ व मिलिंद जाधव यांचा सहभाग राहणार आहे.

ग्रंथोत्सवाची सुरुवात दि. 16 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका मीनाताई वरपुडकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सविता बिरगे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे तसेच सुप्रसिद्ध कथाकार राजेंद्र गहाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मंगळवार, दि. 17 मार्च रोजी सकाळी 11.00 वा. प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिसंवाद कार्यक्रमात डॉ. अशोक कोलंबीकर, सुभाष ढगे, जीवन लोखंडे यांचा सहभाग राहणार आहे. सामाजिक जीवनात ग्रंथालयांचे महत्त्व हा परिसंवादाचा विषय आहे.

दुपारी 2.30 वा. जेष्ठ कवी केशव वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे. दुपारी 4.00 वा. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, प्राचार्य राहूल नितनवरे हे उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांच्या स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील वाचनप्रेमींना विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या ग्रंथोत्सवाचा लाभ परभणी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक आणि वाचनप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बाळासाहेब देवणे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande