
चंद्रपूर, 13 मार्च (हिं.स.)।
पोंभुर्णा वनपरिक्षेत्राच्या फिस्कुटी शेतशिवारात शेळ्या - मेंढ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला करून एका मेंढपाळाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
जुनासुर्ला येथील वासुदेव गणपत कंकलवार (३७) हे शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन फिस्कुटी येथील शेतशिवारात महाकाली मंदिर परिसरात मुक्कामी होते. शेळ्या-मेंढ्यांच्या कळपाचे रक्षण करण्यासाठी ते आपल्या भाऊ व वहिनीसोबत रात्री कळपाजवळच झोपले होते. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री वाघाने अचानक कळपावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कळपात एकच गोंधळ उडाला. आवाज ऐकून वासुदेव कंकलवार जागे झाले असता वाघाने त्यांच्यावर झडप घातली. काही वेळाने नातेवाईकांसह वासुदेव कंकलवार यांचा शोध घेतला असता महाकाली मंदिराजवळील शेतशिवारात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने पोलीस व वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन मूल येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव