
नाशिक, 13 मार्च (हिं.स.)।
त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यात यावीत. अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सिंहस्थ कुंभमेळा शिखर परिषदेच्या बैठकीत केला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात प्रशासनाला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. बैठकीसाठी कुंभ मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि विविध विभागांचे सचिव तसेच नाशिक जिल्ह्यातील विधानमंडळ सदस्य उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार आवश्यकतेप्रमाणे अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून बहुतांश कामे सुरू आहेत. ही सर्व कामे निश्चित वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही कामे अपूर्ण राहिल्यास भाविकांच्या दळणवळणावर तसेच व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे गोदावरी नदी स्वच्छता असल्याचे सांगत मंत्री भुजबळ यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. “इतर काही झाले नाही तरी चालेल, मात्र गोदावरीतील पाणी स्वच्छ आणि निर्मळ असणे अत्यंत आवश्यक आहे. भाविक लाखोंच्या संख्येने मनोभावे स्नानासाठी येतात, त्यामुळे नदी स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देण्यात यावे,” असे त्यांनी सांगितले.
पर्व कालावधीत भाविकांच्या सोयीसुविधांवर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पार्किंगपासून स्नान घाटापर्यंत भाविकांना जास्त अंतर पायी चालावे लागू नये यासाठी नियोजन करावे. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, यासाठी वाहतूक, पार्किंग व मार्ग व्यवस्थापन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पर्व कालावधीत रामकुंड येथे होणाऱ्या अमृत स्नानासाठी साधू-महंतांच्या मिरवणुकीच्या मार्गाबाबतही आधीच निश्चित नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी विविध आखाड्यांचे साधू-महंत यांच्याशी कुंभ मंत्री यांनी समन्वय साधून अमृत स्नानासाठी जाणारा मार्ग पूर्वनियोजित करावा, जेणेकरून पर्वकाळात कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्याशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी अचानक भेट द्यावी, अशीही विनंती मंत्री भुजबळ यांनी केली. यामुळे कामांचा वेग वाढेल तसेच कामे अधिक दर्जेदार होतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो राज्याची प्रतिष्ठा आणि व्यवस्थापनाची क्षमता दाखवणारा जागतिक स्तरावरील सोहळा आहे. त्यामुळे सर्व कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे आवाहनही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV