
छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) जानेवारी २०२६ चा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा इंग्रजी 30, 40 व 50 शब्द प्रति मिनिट (श.प्र.मि.) या विषयांची दि. 5 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत तसेच मराठी, हिंदी 30 व 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी 60 श.प्र.मि. या विषयांची परीक्षा दि. 13 ते 17 जानेवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.
या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mscepune.in येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. परीक्षार्थींना त्यांच्या गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट काढता येणार असून प्रमाणपत्रे व गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
संबंधित संस्थांनी ही प्रमाणपत्रे 100 जीएसएम कागदावर कलर प्रिंटद्वारे छापून विद्यार्थ्यांना वितरीत करावीत. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची सॉफ्टकॉपी (पीडीएफ स्वरूपात) देखील देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात आवश्यकतेनुसार प्रमाणपत्राची कलर प्रिंट काढता येईल. संस्थांनी विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या प्रमाणपत्र व गुणपत्रकाची पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी.
निकाल जाहीर झाल्यापासून 10 दिवसांच्या आत परीक्षार्थींनी गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेमार्फत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रुपये 100 तर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी प्रति विषय रुपये 400 इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने दि. 20 मार्च 2026 पर्यंत भरता येणार आहे.
छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसांच्या आत पुर्नमूल्यांकनासाठी प्रति विषय रुपये 600 इतकी रक्कम ऑनलाईन भरून अर्ज करावा लागणार आहे. निर्धारित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. यासंदर्भातील सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis