

पनवेल, 13 मार्च (हिं.स.)। घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याविरोधात पनवेलमध्ये काँग्रेसच्या वतीने अनोखे ‘तिरडी आंदोलन’ करण्यात आले. गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पायी मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.
आखाती देशांतील तणावपूर्ण युद्धपरिस्थितीमुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम देशातील इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्यावरही होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पनवेल शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून अनेक भागांमध्ये नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे.
या पार्श्वभूमीवर पनवेल काँग्रेसच्या वतीने तिरडी उचलून पायी मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचा निषेध व्यक्त करत प्रशासन आणि गॅस वितरण व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील व नगरसेवक हरेश केणी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, लतीफ शेख, लीला कातकरी, डॉ. अमित दवे, अमित लोखंडे, राकेश जाधव, सुरेश पाटील, सुधीर मोरे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. हा मोर्चा पनवेल येथील प्रांत कार्यालयापर्यंत नेण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)