मुंबईतील प्रदूषणावर दीपिका पादुकोणने केली चिंता व्यक्त
मुंबई, 13 मार्च (हिं.स.)। बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी दीपिका पादुकोण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर कामाच्या ठिकाणी आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. या मागणीमुळे सोशल मीडियावर ति
Deepika Padukone BMC Mumbai pollution


मुंबई, 13 मार्च (हिं.स.)। बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी दीपिका पादुकोण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर कामाच्या ठिकाणी आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. या मागणीमुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीकाही झाली आणि काही चित्रपटांमधून तिला बाहेर काढल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र या सर्व घडामोडींनंतरही दीपिकाने आपल्या भूमिकेत कोणतीही माघार घेतलेली नाही. विविध सामाजिक मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडणारी दीपिका आता मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या प्रश्नामुळे चर्चेत आली आहे.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करत मुंबईतील हवेच्या खराब होत चाललेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये तिने शहरातील प्रदूषणाची सद्यस्थिती दर्शवणारा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI 150 च्या वर गेल्याचे दिसून येत आहे. ही पातळी आरोग्यासाठी धोकादायक मानली जाते. या स्क्रीनशॉटसोबत दीपिकाने मुंबई महापालिकेला म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ला टॅग करत अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती केली आहे.

पोस्टमध्ये दीपिकाने मुंबईतील नागरिक, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता खालावत असल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे तिने नमूद केले. लहान मुलांवर त्याचा अधिक परिणाम होत असल्याचे सांगत “शहरातील मुलं अक्षरशः गुदमरत आहेत, हे कसं योग्य असू शकतं?” असा सवालही तिने उपस्थित केला. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करणारी दीपिका ही एकटीच नाही. यापूर्वी अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि सयामी खेर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शहरातील प्रदूषणाच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधले होते. सतत वाढणारी वाहनसंख्या, बांधकामे आणि हवामानातील बदल यामुळे मुंबईतील हवा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबतच अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, जयदीप अहलावत आणि राणी मुखर्जी यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज दिसणार आहे. याशिवाय दिग्दर्शक ॲटली यांच्या एका तेलुगू ॲक्शन चित्रपटातही ती झळकणार असून त्या प्रोजेक्टमध्ये ती अल्लू अर्जुन सोबत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande