
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित राहू नयेत, म्हणून ज्या दिव्यांग लाभार्थ्यानी यूडीआयडी कार्ड काढलेले नाही, त्या लाभार्थ्यांनी 23 मार्च पर्यत नवीन यूडीआयडी कार्ड काढून ते ई-केवायसी करून तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा. प्र) विश्वजित गाताडे यांनी केले आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात 1 हजार रुपयांची वाढ करून 2 हजार 500 इतके अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येत आहे. त्याकरिता लाभर्थ्याचे ऑनलाइन यूडीआयडी कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) डीबीटी पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे यूडीआयडी व आधार संलग्नीकरण करण्याबाबत आढावा बैठकीत जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील एकूण 2968 लाभार्थी यूडीआयडी व आधारशी संलग्न नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. यावेळी लाभार्थ्याची माहिती डीबीटी पोर्टलद्वारे माहिती अपडेट करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी केलेले यूडीआयडी कार्ड संजय गांधी योजना शाखेत जमा केलेले नाही, त्या लाभार्थ्यांनी ते तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावे, असे सूचित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी