
पालघर, 13 मार्च (हिं.स.)। पालघर ग्रामीण भागात घनकचरा व पाणी व्यवस्थापन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद पालघरच्या वतीने सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ही कार्यशाळा पार पडली.
जिल्हा परिषद पालघर, सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन (सी.ई.पी.टी. युनिव्हर्सिटी) तसेच एचडीएफसी बँकेच्या ‘परिवर्तन’ उपक्रमाच्या सहकार्याने पालघर व डहाणू तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या ३० ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व पाणी व्यवस्थापन उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांची अंमलबजावणी अधिक सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे लेखाधिकारी पांडुरंग कोरडे, सी.ई.पी.टी. युनिव्हर्सिटीचे ध्रुव भावसार, केंद्राचे प्रमुख असीम मन्सुरी, उपासना यादव यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी उभारलेल्या स्वच्छता सुविधांचे नियमित संचालन व देखभाल ग्रामपंचायतींनी जबाबदारीने करणे आवश्यक आहे,” असे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामीण भागासाठी घनकचरा व्यवस्थापन व पावसाच्या पाण्याचे संकलन याबाबत मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), प्रधानमंत्री आवास योजना, विकसित भारत अभियान, रोजगार हमी योजना, आजीविका अभियान व माझी वसुंधरा अभियान आदी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत सहभागी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनीही आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत ग्रामविकासासाठी विविध योजनांचे समन्वयाने नियोजन करण्यावर भर दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL