
रायगड, 13 मार्च (हिं.स.)। सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे समोर येत आहे. मात्र रायगड जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही, असे स्पष्ट करत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणारा एलपीजी गॅस केवळ घरगुती कारणांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी घरगुती गॅसचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर होत असल्याच्या तक्रारी आढळून आल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे एका सिलिंडरचे वितरण झाल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यावरच पुढील सिलिंडरचे बुकिंग करता येणार आहे.
रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याने नागरिकांनी अनावश्यक साठा करून ठेवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवून घाईघाईने गॅस खरेदी करण्याचा प्रयत्न करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी ०२१४१-२२७४५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसून पुरवठा नियमित सुरू असल्याने नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)