परभणी - डॉ. अतुल गावंडे व डॉ. तरल पाटील यांची उमरखेड येथे कौटुंबिक भेट
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। जागतिक कीर्तीचे भारतीय वंशाचे अमेरिकन सर्जन, लेखक व सार्वजनिक आरोग्य संशोधक डॉ. अतुल आत्माराम गावंडे (युएसए) आणि नानावटी हॉस्पिटल, मुंबई येथे एम.डी. रेडिओलॉजी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. तरल प्रफुल्ल पाटील यांची उमरखेड ये
Dr. Atul Gawande and Dr. Taral Patil's inspiring family visit to Umarkhed


परभणी, 13 मार्च (हिं.स.)। जागतिक कीर्तीचे भारतीय वंशाचे अमेरिकन सर्जन, लेखक व सार्वजनिक आरोग्य संशोधक डॉ. अतुल आत्माराम गावंडे (युएसए) आणि नानावटी हॉस्पिटल, मुंबई येथे एम.डी. रेडिओलॉजी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. तरल प्रफुल्ल पाटील यांची उमरखेड येथे प्रेरणादायी संवादात्मक कौटुंबिक भेट संपन्न झाली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधण्यात आला आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव तसेच समाजासाठी केलेल्या कार्याविषयी चर्चा झाली.

डॉ. अतुल आत्माराम गावंडे हे भारतीय वंशाचे जागतिक स्तरावर नावाजलेले अमेरिकन सर्जन, लेखक आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक आहेत. त्यांचा जन्म 1965 साली न्यूयॉर्क येथे झाला असला तरी त्यांचे मूळ महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख निर्माण करू शकले आहेत.

सध्या ते हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून बोस्टन येथील ब्रिघम अँड विमेन्स हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून सेवा देत आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कोविड-19 टास्क फोर्समध्ये सदस्य म्हणून त्यांनी आरोग्य सल्लागाराची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

डॉ. गावंडे हे उत्कृष्ट लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या Being Mortal, The Checklist Manifesto आणि Complications या पुस्तकांना जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता मिळाली आहे. ही सर्व पुस्तके न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत स्थान मिळवणारी ठरली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे मराठीसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील गुंतागुंतीचे विषय सामान्य वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याची त्यांची शैली विशेष मानली जाते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित मॅकऑर्थर जीनियस फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. तसेच ‘टाइम’ मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश करून त्यांचा गौरव केला आहे.

आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉ. अतुल गावंडे यांनी आपल्या मातृभूमीशी नाते कायम ठेवले आहे. उमरखेड येथील जीएसजी महाविद्यालयाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून तेथील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व शैक्षणिक उन्नतीसाठी ते सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य करीत असतात. उमरखेड येथे झालेल्या या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande