क्रीडांगणाजवळ कचऱ्याचे डंपिंग; पोयनाडमध्ये आरोग्याचा प्रश्न
रायगड, 13 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड हे गाव जिल्ह्यातील गजबजलेल्या आणि प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मिरची-मसाला आणि इतर किराणा वस्तू होलसेल दरात खरेदी करण्यासाठी रायगड जिल्ह्यासह आसपासच्या भागांतून
Dumping of garbage near the playground; Health issue in Poynad


रायगड, 13 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड हे गाव जिल्ह्यातील गजबजलेल्या आणि प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मिरची-मसाला आणि इतर किराणा वस्तू होलसेल दरात खरेदी करण्यासाठी रायगड जिल्ह्यासह आसपासच्या भागांतून मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात. दर सोमवारी भरणारा पोयनाडचा आठवडी बाजार जिल्हाभर प्रसिद्ध आहे. मात्र या नावाजलेल्या गावाची सध्या ‘घाणीचे साम्राज्य’ अशी अवस्था झाली असून गावाच्या वेशीवर बेकायदेशीरपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या डंपिंग ग्राउंडच्या जवळच झुंझारचे भव्य क्रीडांगण असून जिल्हाभरातून खेळाडू क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांसाठी येथे येतात. तसेच परिसरात हौसिंग सोसायट्या, हॉस्पिटल आणि हॉटेल-रिसॉर्टही आहेत. त्यामुळे या दुर्गंधीचा फटका स्थानिकांसह बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही बसत आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यूसारख्या साथींचा धोका वाढत आहे. शिवाय या कचऱ्याला वारंवार आग लावली जात असल्याने परिसरात धुराचे ढग पसरतात. त्यामुळे खेळाडू, नागरिक आणि ये-जा करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी अवैध डंपिंगविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हे डंपिंग ग्राउंड हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande