नाशिक - शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह
नाशिक, 13 मार्च (हिं.स.)। : नाशिक येथील यूथ फेस्टिव्हल मैदानावर सुरू असलेल्या कृषी कुंभ २०२६ मधील ‘शेतकरी जुगाड ते तंत्रज्ञान’ स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील रमाकांत बागूल यांनी तयार केलेल्या ‘कांदे वाफे खाचे’ या यंत्रास प्रथम क्रमांक मिळाला, तर द्वितीय
Farmers are enthusiastic about


नाशिक, 13 मार्च (हिं.स.)। : नाशिक येथील यूथ फेस्टिव्हल मैदानावर सुरू असलेल्या कृषी कुंभ २०२६ मधील ‘शेतकरी जुगाड ते तंत्रज्ञान’ स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील रमाकांत बागूल यांनी तयार केलेल्या ‘कांदे वाफे खाचे’ या यंत्रास प्रथम क्रमांक मिळाला, तर द्वितीय पारितोषिक नाशिक येथील रवींद्र भगवान शेवाळे (गवत कापणी यंत्र), तृतीय पारितोषिक नाशिक बापूसाहेब भाऊसाहेब साळुंखे (वाफसा तयार करणारे यंत्र) यांना मिळाले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, ‘आत्मा’ व माविम नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत कृषी कुंभ 2026 सुरू आहे. त्याचे उदघाटन १२ मार्च रोजी करण्यात आले. कृषी कुंभला आज दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी भेट देत नवनवीन तंत्रज्ञानांची माहिती जाणून घेतली. तसेच विविध कृषी विषयक प्रात्यक्षिके, कृषी प्रक्रिया व बचत गटाची दालने, वेगवेगळ्या कृषी निविष्ठांची दालने अशा वैविध्यपूर्ण बाबींना प्रत्यक्ष भेट देत माहिती घेतली. कृषी कुंभमध्ये आज शेतकऱ्यांसाठी कृषी परिसंवाद, शेतकरी पुरस्कार व शेतकरी जुगाड तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकरी परिसंवादामध्ये जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष पिकातील नवीन तंत्रज्ञान, नवीन सुधारित वाण, बदलत्या हवामानाच्या दृष्टीने द्राक्ष शेतीत करावयाचे बदल याबाबत सह्याद्री फार्मचे द्राक्ष तज्ञ पंकज नाठे, पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अनंत भास्करराव मोरे यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी परिसंवादानंतर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या २५ शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कृषी कुंभनिमित्त शेतकरी जुगाड ते तंत्रज्ञान ही आगळी- वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी विकसित केलेली, शेतीकाम सोपे करणारी यंत्रे व तंत्रज्ञान सादर केले. त्यातील सहभागी शेतकऱ्यांची नावे अशी-

१. रमाकांत बागूल, कांदा वाफे खाचे यंत्र (धुळे)

२. नीलेश पवार, पीक संरक्षण व अंडी उबवणी यंत्र (नाशिक)

३. संपत चिंचवडे ऊसाचे टिपरे मातीआड करण्याचे यंत्र (पुणे)

४. कांतिलाल पाटील, कीटक सापळे (जळगाव)

५. बापूसाहेब साळुंखे, कडक बोध भुसभुशीत करून अनुकूल वाफसा तयार करणारे यंत्र (नाशिक)

६. रवींद्र भगवान शेवाळे, डाळिंब बागेतील गवत कापणी यंत्र (नाशिक)

७. राजेश गंगाधर पाटील, स्वस्त जीवामृत तंत्र (नाशिक)

८. प्रतीक व भाऊराव जगताप, सौरचलित घरगुती हायड्रोपोनिक्स

९. सदाशिव वामन शेळके, चार जातींचे घरगुती डाळ व पीठ यंत्र (नाशिक)

१०. सुरेश लक्ष्मण घुगे, स्प्रे पंप, प्रतवारी यंत्र व छोटी ट्रॉली (नाशिक)

या प्रदर्शनादरम्यान उपस्थित अधिकारी, शेतकरी यांनी भेटीत या प्रयोगांचे कौतुक केले. हे तंत्रज्ञान केवळ नाविन्यपूर्ण नसून प्रत्यक्ष शेती कामात अत्यंत उपयुक्त असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या स्पर्धेचे परीक्षण तुलसीदास बास्टेवाड (संशोधक, राहुरी), अमित पाटील (वरिष्ठ शास्त्रज्ञ, केव्हीके, मालेगाव), नितीन ठोके (वरिष्ठ शास्त्रज्ञ, केव्हीके नाशिक) यांनी केले. विजेत्यांना व सर्व सहभागी शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यास विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande