
लातूर, 13 मार्च (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील एसटी बस आगारात गुरुवारी रात्री घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत गंभीररीत्या भाजलेले एसटी महामंडळाचे ऑपरेटर बसवराज मठपती यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डिझेल भरत असताना अचानक लागलेल्या आगीच्या भडक्यात ते होरपळले होते. त्यांना तत्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले होते, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास निलंगा बस स्थानकातील अधिकृत डिझेल पंपावर एका एसटी बसमध्ये इंधन भरण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक तांत्रिक बिघाडामुळे ठिणगी पडून आगीचा मोठा भडका उडाला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने तेथे कार्यरत असलेले ऑपरेटर बसवराज मठपती आगीच्या विळख्यात सापडले आणि गंभीर जखमी झाले. ही आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा तास परिसरात आगीचे लोळ आणि धूर दिसत होता. या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली असून महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच निलंगा नगरपालिकेचे नगरसेवक ईश्वर पाटील यांनी तत्परता दाखवत अग्निशामक दलाला पाचारण केले. डिझेल पंपाजवळ मोठा इंधन साठा असल्याने मोठ्या स्फोटाची भीती निर्माण झाली होती, मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टाळला. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या दुर्घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आणि निलंगा शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis