परभणीत 26 मार्च रोजी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। परभणी शहरात सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा 14 व्या वर्षी प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी भव्य शोभायात्र
Grand procession on the occasion of Lord Shri Ram's birth anniversary on March 26 in Parbhani, 14th year of the Public Shri Ram Janmotsav Committee


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

परभणी शहरात सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा 14 व्या वर्षी प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या शोभायात्रेत प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती, पालखी, आकर्षक रथ, पारंपरिक वाद्य पथक यांसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कलापथकांचा सहभाग राहणार आहे. दिल्ली, हरियाणा तसेच सोलापूर, कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथून येणारी सांस्कृतिक व आध्यात्मिक पथकेही यात सहभागी होणार असून स्थानिक कलाकारही विविध कला सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे. या शोभायात्रेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या आदर्श जीवनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. विविध राज्यांतील कलाकारांकडून आध्यात्मिक व सांस्कृतिक कला सादर केल्या जाणार असून नागरिकांना एक वेगळा सांस्कृतिक अनुभव मिळणार आहे.

ही भव्य शोभायात्रा दि. 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून प्रारंभ होऊन नारायण चाळ, श्री अष्टभुजा माता मंदिर, गांधी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मार्गक्रमण करत शनिवार बाजार येथे समारोप होणार आहे.

या निमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रेत परभणी शहरातील नागरिक, युवक-युवती तसेच सर्व धर्मप्रेमी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असल्याचेही आयोजकांनी नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande