
परभणी, 13 मार्च (हिं.स.)।
जिंतूर-परभणी मार्गावर प्रवाशांची प्रचंड संख्या लक्षात घेता आणि एसटी बस शिवाय दुसरा कोणताही सुरक्षित पर्याय नसल्याने जिंतूर-परभणी या गोल्डन रूटवर सलग बससेवा सुरू करून प्रवाशांना सुरक्षित सेवा पुरवावी, असे आदेश परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
जिंतूर ते परभणी गोल्डन रूटवर सलग व दोन्ही बसस्थानकांवर नियमित बस उपलब्ध ठेवून प्रवासी सेवा सुरू करावी, अशी मागणी भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. जिंतूर तालुक्यातील दररोज शेकडो प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने ये-जा करावी लागते. नेहमीच मोठी गर्दी असल्यामुळे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
जिंतूर आगाराकडे जिंतूर-परभणी महामार्गावर प्रवासी सेवा म्हणून बसेस चालवण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार जिंतूर आगारातून नियोजन केले जाते; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या व ठरलेल्या नियोजनानुसार या मार्गावर बसेस नियमित ये-जा करत नाहीत. येथे कागदोपत्री नियोजन वेगळे आणि प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचेही दिसून येते. एका चालक-वाहकाच्या जोडीला सकाळी तीन फेर्या व दुपारी दोन फेर्या करून किलोमीटर पूर्ण करण्याचे काम दिले जाते. वेळेचे बंधन नसते; परंतु त्यांना वेळेवर बस उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या तक्रारी चालक-वाहकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठरलेल्या वेळेत ये-जा होत नाही. परिणामी कधी एकाच वेळी तीन ते चार बसेस लागतात, तर कधी तासभर बस उपलब्ध होत नाही.
प्रत्यक्षात जिंतूर-परभणी या मार्गावर प्रवासी व व्यापार्यांसाठी एसटी बस शिवाय कोणताही पर्याय नाही. रेल्वे मार्ग नसल्यामुळे सर्व प्रवासी आणि व्यापार्यांना एसटी बसवरच अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत जिंतूर-परभणी हा गोल्डन रूट असूनही नियोजनाअभावी प्रवासी, व्यापारी आणि दररोज ये-जा करणार्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती कोकडवार यांनी पालकमंत्री बोर्डीकर यांच्या समोर मांडली.
जिंतूर ते परभणी हा मोठे उत्पन्न देणारा गोल्डन रूट असल्याने या महामार्गावर सलग व दोन्ही बसस्थानकांवर नियमित बस हजर ठेवाव्यात. एक बस भरली की दुसरी बस मार्गस्थ करावी, अशा प्रकारचे नियोजन करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. त्यानुसार कोकडवार यांनी विभाग नियंत्रक श्री. डफळे यांची भेट घेऊन पालकमंत्र्यांचे पत्र सादर केले. यावर विभागीय नियंत्रकांनी तात्काळ लक्ष घालून जिंतूर डेपोत प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेऊ तसेच व्यापारी प्रतिनिधींसोबत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
मोठ्या उत्पन्नाच्या मार्गांकडे का लक्ष दिले जात नाही, हा वरिष्ठांसाठी संशोधनाचा विषय ठरत आहे. बसेस फलाटावर न लागणे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, लाईट, पंखे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्नही अद्याप कायम आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis