
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी चौदा वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी सौ. वैदेही रानडे यांनी केले.
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही लस. ही लस महाग असून, तिचा तुटवडा आहे. जिल्ह्यासाठी 10 हजार 600 लस प्राप्त झालेली असून या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 9 मार्च रोजी आपल्या जिल्ह्यात झालेला आहे. या लसीबाबत समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या अफवांना बळी न पडता 14 वर्षे वयोगटातील मुलींनी घ्यावी. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे अनेक क्लिनिकल चाचण्यांद्वारे सिद्ध झाले आहे. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी पालकांनीही आपल्या मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा. ती शासनामार्फत मोफत देण्यात येत आहे, असेही सौ. रानडे यांनी सांगितले.
चौदा वर्षे वयोगटातील मुलींकरिता एचपीव्ही लसीकरण मोहीम टास्क फोर्स समितीची सभा आज जिल्हा परिषदेच्या दालनामध्ये झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. व्ही.व्ही. बिराजदार, जिल्हा बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट आदी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यासाठी एकूण 10 हजार 600 लस प्राप्त झाली आहे. 14 वर्षे वयोगटातील अंदाजे 9 हजार 859 लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना 30 टक्के लसवाटप करण्यात आले आहे. सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य सेवक तसेच संस्थास्तरावर अशा अंगणवाडी सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
सौ. रानडे म्हणाल्या, एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ 8 मार्च रोजी करण्यात आला आहे. 4 वर्षे वयोगटातील मुलींकरिता आपल्या जिल्ह्यात 9 मार्च रोजी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. तत्पूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 9 ते 14 वयोगटातील जिल्ह्यातील 10 हजार लाभार्थ्यांना ही लस ऑक्टोबर 2025 मध्ये देण्यात आली आहे. लस घेतलेल्या एकाही मुलीला कुठलाही साइड इफेक्ट किंवा ॲलर्जी किंवा तत्सम काहीही लक्षण दिसली नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर काही नकारात्म्क संदेश प्रसारित होत आहेत, त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करावे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हे प्रामुख्याने डिटेक्ट होत आहेत. त्यासाठी एक संरक्षित कवच म्हणून या लसीचा उपयोग होणार आहे. बाजारामध्ये ही लस महाग आहे. तुटवडाही आहे. त्यामुळे लसीकरणाचा कार्यक्रम शासनाने स्वतः पुढाकार घेऊन हाती घेतलेला आहे. याचा लाभ हा जास्तीत जास्त मुलींनी घ्यावा. भविष्यामध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर रोगापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी घ्यावी. कुठल्याही अफवांवर किंवा प्रसारित होणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासकीय संदेश जे आहेत, त्यांचा अवलंब करावा आणि याला भरघोस प्रतिसाद द्यावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी