निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने मनपा आयुक्तांविरोधात हक्कभंगाची सूचना
पालघर, 13 मार्च (हिं.स.)। वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ए’ च्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी वसई विधानसभा मतदारसंघाच्या
निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने आयुक्तांविरोधात हक्कभंगाची सूचना


पालघर, 13 मार्च (हिं.स.)।

वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ए’ च्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभेत हक्कभंगाची सूचना दाखल केली आहे.

महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ए’ च्या नवीन कार्यालय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन १३ मार्च २०२६ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून निमंत्रण पत्रिका वितरित करण्यात आली. मात्र संबंधित कार्यालयाचे कार्यक्षेत्र वसई विधानसभा मतदारसंघात येत असतानाही स्थानिक खासदार डॉ. हेमंत विष्णु सावरा आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांची नावे निमंत्रण पत्रिकेत समाविष्ट करण्यात आलेली नव्हती.

याबाबत नाराजी व्यक्त करत आमदार पंडित यांनी हा प्रकार लोकप्रतिनिधींचा जाहीर अवमान असल्याचा आरोप केला आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाणीवपूर्वक वगळल्याने लोकशाही मूल्यांचा अवमान झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या हक्कभंग समितीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या सन्मान व अधिकारांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचेही आमदार पंडित यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande