
सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिकेचे 249 कर्मचारी 1995 पासून रोजंदारीवर काम करत आहेत. यातील काहींचे निधन झाले आहे तर यातील 80 टक्के कर्मचारी आगामी दोन-तीन वर्षांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेप्रमाणे निर्णय घेऊन 249 कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घ्यावे. शहरात नव्या एमआयडीसीची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात केली.महाराष्ट्र सरकारने मंगळवेढा येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या स्मारकाचे काम रखडले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या स्मारकासाठीची जागा निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात या स्मारकासाठी राज्य शासनाने भरीव निधी द्यावा, अशी मागणी आ. देवेंद्र कोठे यांनी केली.सोलापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी जागेच्या तुटवड्यामुळे नव्या जागा मिळणे जिकरीचे बनले आहे. सोलापुरात असलेल्या रे नगर, गोदूताई विडी घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगारांची वस्ती असून नव्या औद्योगिक वसाहतीमुळे येथील कामगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे सोलापुरात नवीन औद्योगिक वसाहतीची उभारणी करावी, अशी मागणी आ. देवेंद्र कोठे यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड