
मुंबई, 13 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 मार्च रोजी 20वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले होते. तसेच स्थानिक पातळीवर जनसंपर्क आणि संघटन बळकट करण्यासाठी अधिक सक्रिय होण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.
या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सहभाग घेतला आहे. दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात अनेक कलाकारांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले. या वेळी अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे तसेच ऍड.गुरु भरत दाभोलकर यांनी उपस्थित राहून मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि पक्षाच्या नेत्या शालिनी ठाकरे यांचीही उपस्थिती होती. पक्षाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत असून, विविध क्षेत्रातील मान्यवर या मोहिमेत सहभागी होत आहेत. राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सहभाग घेतल्याने पक्षाच्या या अभियानाला नव्या पातळीवर पाठबळ मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही अनेक कलाकरांनी राज ठाकरे आणि मनसेला पाठिंबा दिला होता. तसंच चित्रपटसृष्टीतल्या अनेक प्रश्नांसाठी कलाकार राज ठाकरेंची मदतीचा हात मागताना दिसतात. त्यामुळे आता आणखी कोणते कलाकार मनसेचं सदस्यत्व स्कीकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule