
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। मुंबई पार पडलेल्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत परभणीच्या मराठवाडा हायस्कूलने उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला. इयत्ता आठवी ‘ब’ वर्गातील कु. सई आशिष चिटणीस हिने उत्कृष्ट अभिनय सादर करत वैयक्तिक मुली गटात रौप्य पदक पटकावले.
या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 42 नाटकांचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यामध्ये मराठवाडा हायस्कूलने सादर केलेल्या ‘मोतीचूर’ या नाटकाने प्रभावी सादरीकरण करत तृतीय क्रमांक मिळवला. या यशाबरोबरच संघाला 80 हजार रुपयांचे रोख पारितोषिकही मिळाले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा लौकिक राज्यस्तरावर अधिक उंचावला आहे. या नाटकात कु. सई चिटणीस, सर्वेश चिटणीस, स्वरा कुलकर्णी, साईराज गायकवाड आणि शौर्य गायकवाड यांनी आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयाचे परीक्षकांनीही कौतुक केले. कु. सई चिटणीस हिने साकारलेली भूमिका विशेष गाजली आणि तिच्या दमदार अभिनयामुळे तिला वैयक्तिक गटात रौप्य पदक प्राप्त झाले. या उल्लेखनीय यशाबद्दल कु. सई चिटणीस व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis