परभणीत ‘मिनी सरस’ विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियान, जिल्हा परिषद परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हास्त
महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियान, जिल्हा परिषद परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ करण्यात आला.

या महोत्सवाचे उद्घाटन वनामकृवि चे कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, डॉ. राकेश अहिरे, डॉ. भगवान असेवार तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला बचत गटांनी विविध स्टॉल्स लावले असून त्यामध्ये खाद्य महोत्सव विशेष आकर्षण ठरत आहे. मांडे, पुरणपोळी, दही धपाटे, हुर्डा पार्टी, भरड धान्यांपासून तयार केलेले पदार्थ, पाणीपुरी-चाट तसेच अस्सल मराठवाडी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आस्वाद येथे घेता येत आहे.

तसेच सेंद्रिय हळद, विविध डाळी, मसाले, लोणचे, पापड, काजू, बेदाणा, केळी चिप्स यांसारखी घरगुती उत्पादने उपलब्ध आहेत. शोभेच्या वस्तू, कापडी पिशव्या, लाकडी कोळपाट, खपली गहू आदी वस्तूंचेही स्टॉल्स लावण्यात आले आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माहितीपर स्टॉल्सचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दरम्यान दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

हा महोत्सव 17 मार्च 2026 दरम्यान शेतकरी भवन मैदान, काळीकमान (वनामकृवि), परभणी येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

परभणीकरांनी आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला भेट देऊन ग्रामीण महिलांच्या परिश्रमातून तयार झालेल्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर आणि प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande