विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी मनपा कर्मचाऱ्यांचा 6 एप्रिलपासून बेमुदत कामबंदचा इशारा
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। : परभणी महानगरपालिका कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्या 5 एप्रिल पर्यंत पूर्ण न झाल्यास 6 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्या
विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी मनपा कर्मचाऱ्यांचा 6 एप्रिलपासून बेमुदत कामबंदचा इशारा


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

:

परभणी महानगरपालिका कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्या 5 एप्रिल पर्यंत पूर्ण न झाल्यास 6 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

संघटनेचे अध्यक्ष नासेर खान वहीद खान, उपाध्यक्ष विनय ठाकूर, सचिव विशाल उफाडे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या सदस्यांच्या महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांना यांना एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्याद्वारे, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे महत्त्वाचे सण काही दिवसांवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा कर्मचार्यांचे थकित चार महिन्यांचे वेतन 5 एप्रिलपूर्वी अदा करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. केवळ दोन महिन्यांचे वेतन दिल्यास बँक कर्जाच्या हप्त्यांमध्ये ते वळते होत असल्याने कर्मचार्यांच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही, त्यामुळे चार महिन्यांचे वेतन एकत्रित देणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

तसेच सन 2024-25 च्या वार्षिक वेतनवाढीचा फरक कर्मचार्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा, आरोग्य विभागातील एएनएम कर्मचार्यांना पदोन्नतीनुसार वेतन निश्चिती करावी, आरसीएच एएनएम कर्मचार्यांचे कंत्राटी कालावधीतील एप्रिल 2022 चे थकीत वेतन अदा करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय 12/24 वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढावीत, सेवा निवृत्त अथवा मयत कर्मचार्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे सेवेत सामावून घ्यावे, बायोमेट्रिक हजेरीमुळे कपात झालेले वेतन परत द्यावे, तसेच सातव्या वेतन आयोगानुसार 2016 पासूनचा फरक तात्काळ अदा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वर्ग-3 कर्मचार्यांना गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे तसेच रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वर्ग-3 कर्मचार्यांना 25 हजार रुपये आणि वर्ग-4 कर्मचार्यांना 15 हजार रुपये फेस्टीवल अॅडव्हान्स देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

या सर्व मागण्या 5 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा 6 एप्रिलपासून सर्व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करतील, अशा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande