
सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रालाही गॅस टंचाईच्या झळा आता बसू लागल्या आहेत. मंदिर समितीकडे दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याची माहिती आहे. अधिक प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली तर मंदिर समितीच्या अन्नछत्रालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील तीन चार दिवसांपासून लाडू निर्मिती निम्म्यावर आली आहे.तसेच मंदिर समितीच्या लाडू प्रसाद केंद्राला ही गॅस टंचाईचा फटका बसला आहे. सध्या दररोज दीड ते दोन हजार लाडू तयार केले जात असल्याची माहिती मंदिर समितीच्या सूत्रांनी दिली आहे.
पश्चिम आशियात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून युद्ध सुरु आहे. युद्धामुळे देशासह राज्यभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. इंधन आणि गॅस टंचाईमुळे मोठ-मोठे उद्योग आणि व्यवसाय अडचणीत आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही याची झळ बसू लागली असतानाच राज्यातील प्रमुख देशस्थांना समोरही गॅस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र चालवले जाते. येथे दररोज किमान पाच ते सहा हजार भाविकांना मोफत भोजन प्रसादाचे वाटप केले जाते. त्यासाठी दररोज आठ ते दहा गॅस सिलिंडरची गरज लागते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड