नटराज रंगमंदिर तातडीने सुरू करा; परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनची मागणी
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। जिल्ह्याच्या कलाक्षेत्राचे वैभव मानले जाणारे नटराज रंगमंदिर मागील अनेक वर्षांपासून बंद असून ते तातडीने सुरू करण्यात यावे तसेच जिल्हा क्रीडा संकुलासमोरील नवीन नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण करून तेही कलावंतांसाठी खुले करावे, अश
नटराज रंगमंदिर तातडीने सुरू करा; परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनची मागणी


परभणी, 13 मार्च (हिं.स.)। जिल्ह्याच्या कलाक्षेत्राचे वैभव मानले जाणारे नटराज रंगमंदिर मागील अनेक वर्षांपासून बंद असून ते तातडीने सुरू करण्यात यावे तसेच जिल्हा क्रीडा संकुलासमोरील नवीन नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण करून तेही कलावंतांसाठी खुले करावे, अशी मागणी परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली.

परभणी महानगरपालिकेच्या कार्यालयात असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील तुरुकमाने यांनी नटराज रंगमंदिराची सद्यस्थिती मांडत ते तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना डॉ. तुरुकमाने म्हणाले की, नटराज रंगमंदिर या मंचाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत घडले आहेत. परभणी ही सांस्कृतिक रंगभूमी म्हणून ओळखली जाते. नृत्य, नाट्य, अभिनय, गायन व वादन अशा विविध कलाप्रकारांसाठी नटराज रंगमंदिर हे एक महत्त्वाचे व्यासपीठ होते. मात्र सध्या या रंगमंदिराची दुर्दशा झाली असून ते अनेक वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी योग्य मंच उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यस्तरीय व राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणेही कठीण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच जिल्हा क्रीडा संकुलासमोरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाचे बांधकामही अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने तेही तातडीने पूर्ण करून सुरू करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव राहुल वहीवाळ यांनी केले. याप्रसंगी डॉ. राहुल टेंगसे, अमर गालफाडे, प्रकाश बारबिंड, अंगद सोंगे, परवेज शेख आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande