सोलापूर - महापालिका अंदाजपत्रकासाठी नागरिकांच्या सूचना मागविणार
सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी “आपलं सोलापूर – आपला अर्थसंकल्प” या संकल्पनेअंतर्गत महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. १३ ते १५ मार्च या कालावधीत महापालिकेतील सूचनापेटी
smc


सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी “आपलं सोलापूर – आपला अर्थसंकल्प” या संकल्पनेअंतर्गत महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. १३ ते १५ मार्च या कालावधीत महापालिकेतील सूचनापेटी, मोबाईल ॲप, ब्लॉग आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना आपले अभिप्राय नोंदविता येणार आहेत. अशी माहिती स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.महापालिकेच्या अंदाजपत्रकाची तयारी सध्या सुरू असून शहरातील नागरिकांच्या अपेक्षा आणि भावना या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित व्हाव्यात, यासाठी ही पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांच्या सूचनांचा विचार करून विकासाभिमुख आणि वास्तववादी अंदाजपत्रक सादर करण्यात येईल, तसेच भाजपच्या वचनपूर्तीचा आराखडाही त्यात समाविष्ट असेल, असा विश्वास चाकोते यांनी व्यक्त केला.या सूचनांसाठी महापालिकेने विविध माध्यमांची व्यवस्था केली आहे. शहरातील अनेक ठिकाणी डिजिटल फलकांवर क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मोबाईल ॲप आणि ब्लॉगद्वारेही सूचना नोंदविता येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले.या पत्रकार परिषदेला महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक गणेश वानकर, शिवाजी वाघमोडे, बिज्जू प्रधाने आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande