पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना कै. सौ. कमलताई जामकर ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। मेळघाट परिसरातील आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करून परिवर्तन घडविणार्या पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना यावर्षीचा कै. सौ. कमलताई जामकर ‘दर्पण’ पुरस्कार मान्यवरांच्या उ
Padma Shri Dr. Smita Kolhe conferred with Late Mrs. Kamaltai Jamkar ‘Darpan’ Award


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

मेळघाट परिसरातील आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करून परिवर्तन घडविणार्या पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना यावर्षीचा कै. सौ. कमलताई जामकर ‘दर्पण’ पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, निवड समितीचे सचिव अनिल मोरे, प्रा. किशन चोपडे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, जि.प. सदस्य संग्राम जामकर तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे उपस्थित होते. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, कोल्हे दाम्पत्यांनी आदिवासी भागात सेवा देऊन समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. सेवाकार्यालाच देव मानून त्यांनी समाजासाठी कार्य केले. स्मिताताईंचा जीवनप्रवास प्रेरणादायी असून आजच्या युवा पिढीने हा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. समाजसेवेसाठी कार्य करणार्या व्यक्तीला ‘दर्पण’ पुरस्कार देण्यात आल्यामुळे पुरस्काराचे मूल्य अधिक वाढल्याचेही त्यांनी नमूद केले

आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न गरजेचे....

सत्काराला उत्तर देताना डॉ. स्मिता कोल्हे यांनी मेळघाटातील सेवाकार्यातील अनुभव मांडले. आदिवासी समाजात गुणवत्ता कमी नाही, मात्र संधींचा अभाव असल्यामुळे त्यांच्या विकासाचा अनुशेष राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण कमी असले तरी आदिवासी समाजात मुलींच्या जन्माचे स्वागत केले जाते, स्त्रीभ्रूण हत्या होत नाही, महिलांचा सन्मान राखला जातो आणि कुटुंबव्यवस्था मजबूत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या सुविधा अद्याप त्या भागापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आदिवासींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासकीय प्रयत्नांसोबत समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande