
सोलापूर, 13 मार्च, (हिं.स.)। सांगोला तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राबवलेले ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी ठरले आहे. पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीच्या तोंडावरच माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या गटातील तीन पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या राजकीय भूकंपामुळे पंचायत समितीवरील शेकापचे वर्चस्व जाणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेकाप आणि साळुंखे-पाटील गटाने एकत्र निवडणूक लढविली होती.
मुंबई येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वीच झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे सांगोला तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीस माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, बाळासाहेब एरंडे तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक शिंदे उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते सांगोला पंचायत समितीच्या सभापतिपदाची पहिली संधी भारतीय जनता पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढील कालावधीत शिवसेनेला सभापतिपद देण्याचाही निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड