
परभणी, 13 मार्च (हिं.स.)।
पाथरी तालुक्यातील गुंज येथे होणार्या यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी पाथरी आगार व्यवस्थापकांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे.
15 मार्च ते 20 मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या गुंज येथील यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक व प्रवासी येत असतात. यात्रेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नियमित बससेवेबरोबरच अतिरिक्त बसची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये व वाहतुकीचे नियोजन सुरळीत राहावे, यासाठी पाथरी आगाराकडून पाच दिवसांच्या कालावधीत दोन अतिरिक्त बस चालविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी आ. विटेकर यांनी केली.
यात्रेदरम्यान प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळावी तसेच वाहतुकीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने योग्य ती दक्षता घेऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis