
रायगड, 13 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील पगारदार खातेदारांसाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह सर्व पगारदार खातेदारांना तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच उपलब्ध करून देण्याची घोषणा बँकेने केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक व पगारदार खातेदारांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमा कवचामुळे आकस्मिक मृत्यू किंवा अनपेक्षित परिस्थितीत खातेदारांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबाच्या शिक्षण, दैनंदिन खर्च तसेच कर्ज परतफेडीच्या जबाबदाऱ्या पार पाडणे सोपे होणार आहे. विशेषतः शिक्षक आणि पगारदार कुटुंबांच्या भविष्यासाठी हे संरक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर पगारदार खातेदारांना बिनव्याजी ॲडव्हान्स देण्याचा निर्णयही बँकेने सलग तिसऱ्या वर्षी घेतला आहे. गणेशोत्सव, दिवाळी आणि रमजान ईद यांसारख्या सणासुदीच्या काळात किंवा तातडीच्या आर्थिक गरजांच्या वेळी ही सुविधा खातेदारांसाठी मोठा दिलासा ठरत असते.
बँकेने सध्या ७२५० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला असून ग्राहककेंद्रित सेवा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी खातेदारांनी आपल्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)