
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। परभणी शहरातील धार रोडवरील बंद करण्यात आलेल्या कचरा डेपोच्या जागेवर काही घंटागाडी चालकांकडून पुन्हा घनकचरा, मटन मार्केटमधील वेस्ट कचरा तसेच मृत जनावरे टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अरविंद देशमुख, सुनिल देशमुख, विनोद कदम, श्रीधर देशमुख, दादासाहेब नाईकवाडे, रहेमान खान, अमोल तरवटे, राम नाईकवाडे, यशोदीप नाईकवाडे आदींच्या एका शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्तांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, दीर्घकाळ पाठपुरावा व जनआंदोलनानंतर सुमारे चार वर्षांपूर्वी हा कचरा डेपो बंद करण्यात आला होता. मात्र, काही घंटागाडी चालकांकडून त्या जागेवर अद्यापही दररोज कचरा टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असल्यामुळे या कचर्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेकदा कच-याला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. त्यामुळे धार रोडवरून ये-जा करणा-या नागरिकांना तसेच परिसरातील रहिवाशांना धूर व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात नागरिकांनी संबंधित घंटागाडी चालकांना वारंवार कचरा टाकू नये, अशी विनंती केली असता काही चालकांकडून आरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक व चालक यांच्यात वादावादी होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या बंद कचरा डेपोवरील साचलेला कचरा तात्काळ हटवून परिसर कचरामुक्त करावा, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis