परभणी - बोरीच्या नेमिनाथ जैन यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार जाहीर
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। ग्रंथालयांच्या क्षेत्रात कार्य करणार्या ‘ग्रंथालय भारती’ या संस्थेतर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथपाल, उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. बोरी येथील कै. जयकुमारज
परभणी - बोरीच्या नेमिनाथ जैन यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार जाहीर


परभणी, 13 मार्च (हिं.स.)। ग्रंथालयांच्या क्षेत्रात कार्य करणार्या ‘ग्रंथालय भारती’ या संस्थेतर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथपाल, उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. बोरी येथील कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या छाननीनंतर निकष पूर्ण करणार्या मान्यवरांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये श्रीमती मंगला गोविंद पांडे उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (वडाळा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे ग्रंथपाल दिलीप शिवराम नवेले तसेच परभणी जिल्ह्यातील बोरी येथील कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नेमिनाथ जयकुमार जैन यांना जाहीर झाला आहे.

तसेच सौ. साधना विनोद लोकरे स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी कोल्हापूर येथील जिल्हा ‘अफ दर्जाच्या करवीर वाचन मंदिराची निवड करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रदीप त्र्यंबकराव चौधरी यांना श्रीमती गुलाबबाई राधाकिसन बाहेती स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हे सर्व पुरस्कार रविवार 15 मार्च रोजी नागपूर येथील श्रीराम सभागृहात दुपारी 4 वाजता आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रंथालय भारतीचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर भूषविणार असून ग्रामायण प्रतिष्ठानाचे अध्यक्ष अनिल सांबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रसिद्ध स्तंभलेखक अमोल पुसदकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय भारतीचे केंद्रीय कार्याध्यक्ष रवींद्र गोविंद पांडे, सचिव सुनील वायाळ, विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. अभय टोंगो, संघटन सचिव राजेश राठोड, नागपूर महानगर अध्यक्ष प्रशांत तुंगार आणि सचिव विनय पंडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande