राज्यातील आदिवासी आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, 13 मार्च, (हिं.स.)। राज्यातील सर्वपक्षीय आदिवासी आमदारांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 13 मार्च) राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोक भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व राज्यातील अनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नांव
राज्यातील आदिवासी आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट


मुंबई, 13 मार्च, (हिं.स.)। राज्यातील सर्वपक्षीय आदिवासी आमदारांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 13 मार्च) राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोक भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व राज्यातील अनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.

आपणही आदिवासी समाजातील असून राज्यातील आदिवासींच्या समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधितांशी चर्चा करू तसेच वेळोवेळी आदिवासी क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देऊ असे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिले.

राज्यात कोणकोणते आदिवासी समाज आहेत, त्यांची संख्या किती आहे व ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास आहेत याची माहिती राज्यपालांनी जाणून घेतली.

अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातर्फे आदिवासींच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जनजाती सल्लागार परिषदेची बैठक दर सहा महिन्यातून किमान एकदा व्हावी, शासकीय सेवांमध्ये १२५०० रिक्त पदे भरण्यात यावी, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या तसेच एक निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळाच्या सदस्यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला तसेच त्यांना भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली.

यावेळी विधान मंडळाचे सदस्य भीमराव केराम, हरिश्चंद्र भोये, मंजुळा गावित, हिरामण खोस्कर, डॉ किरण लहामटे, अमशा पडवी, राजू तोडसाम, शिरीष कुमार नाईक व विलास तरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande