
नाशिक, 13 मार्च, (हिं.स.) सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यात व्यापारी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून, स्थानिक वितरण व्यवस्थेकडून पुरवठा मर्यादित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या संस्था व बचत गटांना गॅस सिलिंडर मिळविण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली.
नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मनपा प्राथमिक तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचे काम विविध संस्था व बचत गटांच्या माध्यमातून सेन्ट्रल किचनमार्फत केले जाते. विद्याथ्यांना पौष्टिक व दर्जेदार आहार मिळावा यासाठी मनपा शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. मनपा क्षेत्रात सध्या एकूण ४२ संस्था व बचत गटांच्या माध्यमातून २७९ शाळांमधील सुमारे १,१५,००० विद्याथ्यांना दररोज शालेय पोषण आहार देण्यात येतो.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी वाढीसाठी महत्त्वाचच मानला जातो. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोषण आहार पुरविणाऱ्या संस्था व बचत गटांनी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना निवेदन देत गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. महापौरांनी या विषयाची तातडीने दखल घेत मनपा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गंस सिलिंडर पुरवठा सुरळीत करण्याबाबत लेखी कळविले. सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कोणताही खंड पडू नये, यासाठी मनपा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, पर्यायी व्यवस्था करण्यासाठीही आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण हे आपल्यासाठी सर्वांत महत्वाचे आहे. कोणत्याही पारेस्थितीत शालेय पोषण आहार बंद होऊ देणार नाही.
चौकट -1
गॅस सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना नियमित आहार मिळावा यासाठी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत. शहरातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोषण आहाराचा लाभ पोहोचत राहील. त्यात कुठलाही खंड पडणार नाही, यासाठी मनपा कटिबद्ध आहे.
हिमगौरी आहेर -आडके, महापौर,
चौकट -2
गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यास तरी विद्यार्थ्यांचा आहार खंडित होऊ नये, बासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्हा पुरवठा विभागाशी समन्वय साधुन परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
-डॉ. मिता चौधरी, मनपा प्रशासन अधिकारी
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV