

रायगड, 13 मार्च (हिं.स.)। अलिबाग तालुक्यात शुक्रवारी (दि. 13) भीषण अपघाताची घटना घडली. उसर येथील गेल कंपनीतील कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो बोरघर फाट्याजवळ वळणावर पलटी झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी झाले असून एका कामगाराला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील उसर परिसरात सुरु असलेल्या गेल कंपनीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पावर विविध राज्यांतून आलेले कामगार काम करत आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास काही मुस्लीम कामगार नमाज पठणासाठी रामराज येथे जात होते. त्यासाठी चालक टेम्पोमधून सुमारे 22 कामगारांना घेऊन उसरहून रामराजकडे निघाला होता.
दरम्यान, रामराज मार्गावरील बोरघर फाट्याजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो अचानक पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की टेम्पोतील सर्व कामगार जखमी झाले.
या अपघातात खुशमुहम्मद अल्लाउद्दीन (वय 33) या कामगाराचा मृत्यू झाला. कौसर मल्लिक (वय 24) याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राहतअली कासीमअली (वय 20) याला किरकोळ दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले.
तसेच मोहम्मद रफिक, सोहेब अली, बिट्टूशेट शेख, असीम खान, रोजमहम्मद अली, शाहिद हुसेन, तारिफ हुसेन, नाहीद हुसेन, मोहम्मद खान, फारूक मलिक, तस्लीम हुसैन, अरमान हुसैन, इब्राहिम अली, एजाज अन्सारी, नुसरत अली, महमद वकील, अफरोज अन्सारी, महमदशान अहमद आणि महमद अराफक हे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयातील सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पोलिसांकडून करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)